Site iconSite icon bolbhau.com

bmc headquarter news today- महानगरपालिका मुख्यालयात सुधारित आराखडा मंजुरीविना नूतनीकरण !

मुंबई – इमारतीत फेरबदल करताना मुंबईकरांना नियमांचे पालन करण्यासाठी निर्देश देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका स्वतः मात्र नियमांचे उल्लंघन करत आहे. पालिका मुख्यालयात सुधारित आराखडा मंजुरीविना विविध नूतनीकरण काम करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. bmc headquarter news today अंतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदारातर्फे केवळ रेखाचित्रे सादर करण्यात आली असून कोणत्याही कामासाठी सुधारित आराखडा सादर केला नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे पालिका मुख्यालयात करण्यात आलेल्या विविध कामाची माहिती मागत सुधारित आराखडयाची विचारणा केली होती. पालिकेने वर्ष 2014 पासून आजमितीस बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विविध नूतनीकरण कामाअंतर्गत केलेल्या कामाची माहिती दिली. यात कोठल्याही नूतनीकरण कामांचा सुधारित आराखडा नसल्याने पालिकेने खाजगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत सादर करण्यात आलेली रेखाचित्रे दिली आहेत. यात स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे विस्तारित इमारतीच्या तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा येथे करण्यात आलेल्या सुधारित कामासाठी इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखडयाची मंजुरी घेतली नाही. तर शानदार इंटेरिअर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा आणि पाचव्या माळा येथे करण्यात आलेल्या सुधारित कामासाठी इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखडयाची मंजुरी घेतली नाही, असा आरोप गलगली यांचा आहे.

अनिल गलगली यांच्या मते खरे पाहिले तर याठिकाणी केलेला बदल भविष्यात धोकादायक आहे. विशेष म्हणजे पालिका मुख्यालयात सुधारित काम करताना महानगरपालिका वास्तुविशारद यांच्या संमतीने आराखडा मंजूर करणे आवश्यक आहे पण याकामी खाजगी वास्तुविशारद यांनी तयार केलेल्या रेखाचित्रावर काम करण्यात आले आहे. आता सुधारित आराखडा महानगरपालिका वास्तुविशारद यांच्या संमतीने इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखडयाची मंजुरी घेण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी गलगली यांची मागणी आहे. गलगली यांनी पुढे मागणी केली आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सुधारित आराखडा सादर करत परवानगी शिवाय केलेल्या विविध नूतनीकरण कामाबाबत संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात यावी.

मुख्यालय धोक्यात !

सुधारित आराखडा मंजूर न करता नूतनीकरण आणि अन्य अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहे यात तळमजला येथे राजकीय पक्ष, हेरिटेज हॉल, रोख विभाग, परिरक्षण, सीए कार्यालयाचा समावेश आहे. दुसरा मजल्यावर म्युझियम आहे. पहिला मजल्यावर अध्यक्ष कार्यालय, रीडिंग रूम आहे. दुसरा मजल्यावर उप महापौर कार्यालय, विधी कार्यालय, अतिरिक्त आयुक्त कार्यालय, आपत्कालीन विभाग आहे. तिसरा मजल्यावर संचालक , उपायुक्त आणि सीएकार्यालय आहे. चौथ्या मजल्यावर सीए वित्त, एमसीए, आयटी, चौकशी विभाग यांची कार्यालये आहेत तर पाचव्या मजल्यावर विकास नियोजन यांचे कार्यालय आहे.

सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.

 

Exit mobile version